1.33 कोटींच्या ऑडीचा विराट कोहली भारतातील पहिला ग्राहक
जर्मनीची लग्झरी कार कंपनी ऑडीने भारतात आपली क्यू सीरिजमधील नवीन कार ऑडी क्यू8 लाँच केली आहे. प्रत्येक ऑडी क्यू8 ही ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे बनवण्यात येईल. प्रत्येक ग्राहक आपल्या आवडीनुसार यात कस्टमाइज करू शकेल. कंपनी क्यू8 चे केवळ 200 यूनिट भारतात विकणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लाँच झालेल्या या शानदार कारचा पहिला ग्राहक ठरला.
ऑडीने आपल्या प्लॅगशिप एसयूव्ही कार क्यू8 ला केवळ पेट्रोल इंजिन आणि एक व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. यामध्ये बीएस6 मानक 48व्ही माइल्ड-हायब्रिड सिस्टमसोबत 3 लीटर, व्ही6 टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे. या इंजिनची पॉवर 340एचपी आणि हे 500एनएम टॉर्क निर्माण करते. या कारच्या इंजिनमध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही एसयूव्ही केवळ 5.9 सेंकदात ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते. या एसयूव्हीचा टॉप स्पीड ताशी 250 किमी आहे.
कारमध्ये कॅबिन स्पेस अधिक असून, लगेज स्पेस देखील अधिक देण्यात आले आहे. ऑडी क्यू8 भारतात लाँच झालेली कंपनीची पहिली एसयूव्ही कूपे आहे. क्यू8 मध्ये मोठे ग्रील, सनरूफ, फ्रेमलेस डोर, स्टँडर्ड एचडी मॅट्रिक्स एलईडी टेक्नोलॉजी असणारी हेडलाईट्स, एलईडी स्ट्रिप लाईट्स, पॉवरफूल इंडीकेटर्स आणि बोल्ड व्हिल आर्च देण्यात आलेले आहेत.
या कारच्या आत लेटेस्ट ड्युअल टचस्क्रीन कंट्रोल सिस्टम मिळेल. इंफोटेनमेंट आणि नेव्हिगेशनसाठी 10.1 इंच स्क्रीन आहे. त्याच्या खाली दुसरी स्क्रीन 8.1 असून, ज्याच्यावर स्क्रीन हिटिंग, व्हेंटिलेशन आणि एसी सिस्टमला कंट्रोल करता येईल. ऑडी क्यू8 ची एक्स शोरुम किंमत 1.33 कोटी रुपये आहे.