नवीन लूकसह लोकप्रिय स्कूटर ‘होंडा डिओ’ बाजारात दाखल
होंडाने बीएस-6 मानक इंजिनसह नव्या लूकमध्ये आपली लोकप्रिय स्कूटर होंडा डिओला लाँच केले आहे. ही स्कूटर स्टँडर्ड आणि डीलक्स अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यातील स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 59,990 रुपये आणि डीलक्स व्हेरिएंटची किंमत 63,340 रुपये आहे.
बीएस-4 इंजिन मॉडेलच्या तुलनेत नवीन मॉडेलची किंमत 7 हजार रुपये अधिक आहे. नवीन स्कूटरमध्ये इंजिनसह लूकमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. नवीन होंडा डिओमध्ये बीएस-6 मानक 110सीसी इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 8000 आरपीएमवर 7.79एचपी पॉवर आणि 5,250आरपीएमवर 8.79एनएम टॉर्क निर्माण करते. कंपनीने या स्कूटरमध्ये सायलेंट स्टार्ट फीचर देखील दिले आहे.
नवीन डिओमध्ये फूल-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलेले आहे. यामध्ये रेंज, मायलेज, रिअल-टाइम मायलेज आणि सर्व्हिस ड्यू इंडिकेटर सारखी माहिती मिळेल. यामध्ये पर्यायी साइड-स्टँड डाउन इंजिन इन्हॅबिटर फीचर देखील देण्यात आले आहे. हे फीचर असल्यावर जर स्कूटरचे साइड स्टँड खाली असेल, तर स्कूटर चालू होणार नाही. याशिवाय पास-लाइट स्विच, एक्सटर्नल फ्यूल फिलर कॅपसारखे फीचर्स देखील मिळतील.
या स्कूटरमध्ये नवीन एलईडी, मॉडर्न टेललॅम्प डिझाईन, स्पिलट ग्रॅब रेल्स, शार्प लोगो आणि नवीन बॉडी ग्राफिक्स देण्यात आले आहेत. नवीन मॉडेलमध्ये 12 इंचाचे फ्रंट व्हिल मिळतील. पुढील बाजूला टेलेस्कोपिक सस्पेंशन देखील मिळेल. डिओच्या स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये अॅक्सिस ग्रे मॅटेलिक, कँडी जॅजी ब्लू, स्पोर्ट्स रेड आणि वायब्रेंट ऑरेंज रंगाचे पर्याय मिळतील. डीलक्स व्हेरिएंटमध्ये मॅट रेड मॅटेलिक, डॅझल येलो मॅटेलिक आणि मॅट अॅक्सिस ग्रे मॅटेलिक हे तीन रंग उपलब्ध आहेत.