
१० लाख भारतीयांना रोजगार देणार ‘अॅमेझॉन’
नवी दिल्ली – अॅमेझॉनने येत्या पाच वर्षांच्या कालावधीत भारतात १ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केल्यानंतर रोजगारनिर्मितीबाबत आता महत्त्वाची घोषणा केली आहे. भारतात येत्या ५ वर्षांत अॅमेझॉनतर्फे १० लाख नवे रोजगार निर्माण केले जातील, असे भारतभेटीवर आलेले अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांनी सांगितले. अॅमेझॉनकडून तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व दळणवळण क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून हे रोजगार उपलब्ध होतील, असे ते म्हणाले. अॅमेझॉनने गेल्या ६ वर्षांच्या कालावधीत भारतात ७ लाख रोजगार निर्माण केले आहेत.
येथील व्यवसायात आमच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे. आमच्याशी जोडल्या गेलेल्या लहान व्यावसायिकांनी असामान्य सृजन दाखवले आहे. तसेच, आमच्या मंचावरून विकल्या जाणाऱ्या उत्पादनांना येथील ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे येथे भविष्यात व्यवसायविस्तार करण्याचे उद्दिष्ट कंपनीने आखले असून त्यातून स्थानिक तरुणांना रोजगार व देशी व्यावसायिकांना बाजार उपलब्ध होईल, असे बेझोस म्हणाले.
येथील व्यवसायात अॅमेझॉनला मोठ्या प्रमाणावर तोटा होत असल्याने १ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक ते करणार आहेत, ते त्यामुळे आपल्या देशावर कोणत्याही प्रकारे उपकार करत नाहीत, अशा शब्दांत केंद्रीय उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी अॅमेझॉनचा समाचार घेतला होता. शुक्रवारी त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. काही बहुराष्ट्रीय तसेच, देशी कंपन्यांनी या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर नरमाईची भूमिका घेत गोयल यांनी विदेशी कंपन्यांच्या गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो, मात्र त्यांनी येथील कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.