विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंडचा बदलला हेड कोच, आता हा दिग्गज करणार मार्गदर्शन
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सोमवारी (7 ऑक्टोबर) इंग्लंड क्रिकेट संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाची नेमनुक केली आहे. त्यांनी ख्रिस सिल्व्हरहूड यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. सिल्व्हरहूड हे इंग्लंडचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. पण आता त्यांची बढती मुख्य प्रशिक्षक म्हणून झाली आहे.
त्यामुळे ते आता इंग्लंडचे माजी मुख्य प्रशिक्षक ट्रेवर बायलिस यांची जागा घेतील. बायलिस यांचा 2019 च्या ऍशेस मालिकेनंतर इंग्लंडबरोबरील करार संपला आहे.
“इंग्लंडचा पुरुष क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून ख्रिस यांची निवड करताना आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही या निवड प्रक्रियेनुसार गेलो. तसेच आमच्याकडे असणारे सर्व उमेदवारांचे पर्याय आम्ही पाहिले आहेत. पण यातील ख्रिस हे उत्कृष्ट उमेदवार होते,” असे इंग्लंडचे क्रिकेट संचालक ऍश्ले गिल्स यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.’
तसेच सिल्व्हरहूड यांनीही मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. सिल्व्हरवूड यांनी इंग्लंडकडून 1996 आणि 2002 दरम्यान 6 कसोटी सामने आणि 7 वनडे सामने खेळले आहेत.