रोहित शर्माने फक्त विश्वविक्रमच केले नाही तर आयसीसी क्रमवारीतही केलायं हा मोठा पराक्रम
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला कसोटी सामना रविवारी(६ ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात भारताने २०३ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यानंतर सोमवारी(७ ऑक्टोबर) आयसीसीने कसोटी क्रमवारी घोषित केली आहे.
या क्रमवारीत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने मोठी गरुड झेप घेतली आहे. रोहितने कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. त्याने ३६ स्थानांनी उडी घेत १७ वे स्थान मिळवले आहे.
रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात १७६ आणि दुसऱ्या डावात १२७ धावांची खेळी केली होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला पहिल्या कसोटीचा सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
रोहितबरोबरच या क्रमवारीत मयंक अगरवालनेही कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. त्याने ३८ स्थानांची झेप घेत २५ वे स्थान मिळवले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात २१५ धावांची खेळी केली होती.
याबरोबरच रविंद्र जडेजाने कारकिर्दीतील सर्वोत्तम ५२४ गुण मिळवताना २ स्थानांची प्रगती केली आहे. तो आता फलंदाजी क्रमवारीत ५२ व्या स्थानावर आला आहे.