धोनीबाबत शास्त्रींचा मोठा खुलासा

Thote Shubham

विश्वचषक स्पर्धेनंतर भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी क्रिकेटच्या मैदानावर दिसलेला नाही. इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर धोनीने एकही सामना खेळलेला नाही.

विश्वचषकानंतर धोनी निवृत्ती घेणार असे म्हटले जात होते. पण त्याला पूर्णविराम मिळाला असून धोनी डिसेंबरमध्ये विंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेतून पुनरागमन करू शकतो. दरम्यान, धोनीच्या पुनरागमनाबद्दल विचारण्यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना आल्यानंतर याचा निर्णय धोनी स्वत: घेईल असे शास्त्रींनी म्हटले आहे.

संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विश्वचषक स्पर्धेनंतर धोनीशी भेट झाली नसल्याचे सांगितले आहे. ‘द हिंदू’ ला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्रींना विचारण्यात आले की धोनीच्या पुनरागमनाची शक्यता आहे का? रवी शास्त्री यावर म्हणाले की, धोनी जर पुनरागमन करू इच्छित असेल तर तो सर्वस्वी त्याचा निर्णय असेल. धोनी भारताचा महान खेळाडू म्हणून ओळखला जाईल असे त्यांनी म्हटल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शास्त्री म्हणाले की, विश्वचषक स्पर्धेनंतर धोनीला भेटलेलो नाही. आधी त्याने क्रिकेट खेळायला सुरू करायला हवे. त्यानंतर काय होते हे बघायला पाहिजे. त्याला विश्वचषक स्पर्धेनंतर क्रिकेट खेळलेले पाहिले नाही. जर त्याला पुनरागमन करायचे असेल तर त्याची माहिती निवड समितीला द्यावी लागेल, असे शास्त्री म्हणाले.

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऋद्धिमान साहाला यष्टीरक्षणाची संधी दिली आहे. प्लेइंग इलेव्हनमधून ऋषभ पंतला वगळण्यात आले आहे. रवी शास्त्री याबद्दल सांगताना म्हणाले की, दुखापतीमुळे साहाला विश्रांती देण्यात आली होती. तो जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक असून घरच्या मैदानावर त्याची कामगिरी जबरदस्त आहे. पंतमध्ये प्रतिभा आहे आणि त्याच्या क्षमतेवर कोणतीही शंका नाही. मात्र तो अजुन तरूण आहे. त्याच्याकडे सुधारणा करण्यासाठी बराच वेळ आहे.


Find Out More:

Related Articles: