सीबीएसई बोर्ड परीक्षा शुल्कात तब्बल 24 पट वाढ

पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (सीबीएससी) दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ केली आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क फक्त 50 रुपये होते, ते आता 1,200 करण्यात आले आहे. तर सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सध्याचे शुल्क 1,500 रुपये होते, ती दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करण्यात आले आहे.

यंदाच्या परीक्षांपासून ही शुल्क वाढ लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा दहावी-बारावीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, त्यांच्याकडून उर्वरीत शुल्क भरून घेण्याची सूचनाही संबंधित शाळांना करण्यात आली आहे. अनुसूचित जाती-जमातींचे विद्यार्थ्यांच्या शुल्कात 24 पट वाढ करण्यात आली आहे. तर सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शुल्कामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

हे शुल्क नियमित पाच विषयांसाठी असणार आहे. तर हे पाच विषय सोडून अतिरिक्त एका विषयासाठी सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 300 रुपये शुल्क असणार आहे. यात 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढवलेले पूर्ण शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नसल्याचे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे.


Find Out More:

Related Articles: