मास्क, सॅनिटायजरचा काळा बाजार केल्यास कारवाई करणार, छगन भुजबळ यांचा इशारा

Thote Shubham

मुंबई : जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने 2 प्लाय आणि 3 प्लाय सर्जिकल मास्क, एन 95 मास्क आणि हॅन्ड सॅनिटायजर या बाबींचा समावेश जीवनाश्यक वस्तुमध्ये समावेश करण्यात आला आहे. या वस्तूंचा कृत्रिम तुडवडा निर्माण केल्यास किंवा काळाबाजार केल्यास विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

 

मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने केंद्र शासनाने 13 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार जीवनावश्यक वस्तु अधिनियम, 1955 च्या परिशिष्टामध्ये कलम 2 ए अंतर्गत अनुक्रमांक 8 मध्ये (8) मास्क, 2 प्लाय आणि 3 प्लाय सर्जिकल मास्क, एन 95 मास्क आणि हॅन्ड सॅनिटायजर या बाबींचा समावेश जीवनाश्यक वस्तु म्हणून केला आहे. ही अधिसूचना दि. 13 मार्च ते दि. 30 जून 2020 पर्यंत लागू करण्यात आली आहे. ही अधिसूचना विभागाने दि. 14 मार्च रोजी पुनर्प्रकाशित केली असून कार्यवाहीसाठी विभागांतर्गत संबंधित यंत्रणांना तसेच गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात आली आहे.

 

या अधिसुचनेनुसार केंद्र शासनाने 2 प्लाय आणि 3 प्लाय सर्जिकल मास्क, एन 95 मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर यांचा साठा होऊ नये, या बाबी चढ्या किंमतीने विकू नये, ग्राहकांना या बाबी सहजासहजी उपलब्ध व्हाव्यात, काळा बाजार होऊ नये व जनतेमध्ये या बाबी चढ्या सहज उपलब्ध होतील तसेच जनजागृती होईल याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या अधिसूचनेनुसार 2 प्लाय आणि 3 प्लाय सर्जिकल मास्क, एन 95 मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर यांचा कृत्रिम तुटवडा तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर वैद्यमापन विभागाला कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती श्री. भुजबळ यांनी दिली आहे.

Find Out More:

Related Articles: