पुण्यातील मेघा व्यास डॉक्टर नव्हत्या आणि त्यांचे निधन कोरोनामुळे झाले नाही ; वाचा सत्य
सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, पुण्यात डॉक्टर असणाऱ्या मेघा व्यास नामक महिलेचे कोरोनाची लागण झाल्यामुळे निधन झाले. एका महिलेचा फोटो पोस्ट करून दावा केला जातोय की, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना त्यांना लागण झाली होती.
तथ्य पडताळणी सोशल मीडियावर शोध घेतला असता कळाले की, याविषयी अनेकांनी फेसबुक व व्हाट्स अँप पोस्ट केल्या आहेत. त्यांची पडताळणी केली असता कळाले की, मेघा व्यास यांच्या निधनाविषयी खोटे दावे करण्यात येत आहेत.
सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे मेघा यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट खोट्या आहेत. मेघा यांचे निधन कोरोनामुळे झाले नाही. तसेच त्या डॉक्टर नव्हत्या. मेघा यांचे पती डॉ श्रीकांत शर्मा यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, 22 एप्रिल रोजी मेघा यांचे निधन झाले. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवालसुद्धा निगेटिव्ह आला. जहांगीर हॉस्पिटलने यामध्ये स्पष्ट म्हटले की, त्यांना कोरोना नव्हता. निधनाचे कारण तीव्र न्युमोनिया सांगितले आहे.