राज्यात केवळ दोन दिवसात कोरोनाचे 700 रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Thote Shubham
मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या सुमारे ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० आणि ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असून सुमारे सव्वा महिन्यात २८१९ रुग्णांना घरी सोडण्यात आले.


राज्यात ९ मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर २५ मार्चला पहिल्यांदा पुणे येथील दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले त्यानंतर दररोज राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. सोमवारी ४ मे रोजी पहिल्यांदाच ३५० रुग्णांना तर लगेच दुसऱ्या दिवशी ३५४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली. राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात ४६० रुग्ण गेल्या दोन दिवसात घरी गेले. त्यापाठोपाठ पुणे मंडळात २१३ रुग्णांना पाठविण्यात आले, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Find Out More:

Related Articles: