प्रेरणादायक! ओडिसातील पहिली आदिवासी महिला बनली पायलट

Thote Shubham

ओडिसा राज्यातील नक्षलवादग्रस्त जिल्हा मलकानगिरी येथील आदिवासी मुलीने काही वर्षांपूर्वी आकाशात उडण्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते पूर्ण करण्यासाठी तिने अभियांत्रिकी अभ्यास सोडला. अखेर आज तिचे स्वप्न पूर्ण झाले आहे.  ही प्रेरणादायक कहाणी आहे २३ वर्षीय अनुप्रिया लाकडा यांची.

अनुप्रिया ओडिसामधील पहिली आदिवासी महिला पायलट बनली आहे. पायलट बनण्याच्या प्रयत्नात, अनुप्रियाने सात वर्षांपूर्वी अभियांत्रिकी अभ्यास सोडला होता आणि २०१२ मध्ये ती एव्हिएशन अ‍ॅकॅडमीमध्ये दाखल झाली. आपली क्षमता आणि समर्पणाच्या जोरावर ती लवकरच एका खासगी विमान कंपनीत सह-पायलट म्हणून काम करणार आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी अनुप्रियाचे अभिनंदन केले आणि ते इतरांसाठी एक उदाहरण असेल, असे सांगितले.

पटनायक यांनी ट्वीट केले की, “अनुप्रिया लाकडा यांनी मिळवलेल्या यशाबद्दल मला आनंद झाला आहे. त्यांनी अविरत प्रयत्नांनी आणि चिकाटीने मिळविलेले यश हे बर्‍याच जणांसाठी उदाहरण आहे. एक सक्षम पायलट म्हणून अनुप्रियाला अधिकाधिक यश मिळो, अशी शुभेच्छा. “अनुप्रियाचे वडील मरिनियास लाकडा ओडिशा ओडिसा पोलीस मध्ये हवालदार आहेत आणि आई जमज यास्मीन लाकडा गृहिणी आहेत.

अनुप्रियाचे वडील म्हणाले, “पायलट होण्याच्या इच्छेमुळे तिने इंजिनीअरिंगचे शिक्षण मधेच सोडले आणि भुवनेश्वर येथून पायलट प्रवेश परीक्षेची तयारी केली. २०१२ मध्ये, अनुप्रियाने भुवनेश्वरमधील पायलट प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. आज पायलट होऊन तिने तिचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले, याचा आम्हाला आनंद आहे. ती एका खासगी विमान कंपनीत सह-पायलट म्हणून काम करेल.

अनुप्रियाचे वडिल म्हणाले, “मलकानगिरीसारख्या मागास जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीसाठी ही मोठी कामगिरी आहे.” अनुप्रियाची आई म्हणाली, “मला खूप आनंद झाला आहे. मलकानगिरीच्या लोकांसाठी ही अभिमानाची बाब आहे. तिचे यश इतर मुलींना प्रेरणा देईल.


Find Out More:

Related Articles: