दिवसा घेतलेल्या डुलकीने वाढते कामातील एकाग्रता
झोप ही आरोग्याच्या दृष्टीनं अत्यावश्यक बाब आहे. प्रत्येकाला किमान सात ते आठ तास झोप आवश्यकच असते; पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आठ तास निवांत आणि निर्विघ्न झोप मिळणं हे क्वचितच साध्य होणारं स्वप्न असतं. अपुऱ्या झोपेमुळे अनेकांना दिवसभर झापड येत राहते.
मग कडक चहा, कॉफी यांचा सहारा घेऊन ती मरगळ घालवत रोजची व्यावहारिक कामं भागवली जातात; पण अपुऱ्या झोपेमुळे येणारी पेंग उडवणारी ही उत्तेजक पेयं रात्रीच्या झोपेवर आक्रमण करतात आणि रात्रीची झोप उडून जास्त टवटवी येते. मग उशीरापर्यंत टीव्ही पाहणं, संगणकावर, मोबाइलवर व्हिडिओ पाहणं, नेटफ्लिक्स किंवा तत्सम गोष्टींचा आस्वाद घेणं यांचे रहाटगाडगे सुरू होतात.
रात्री उशीरा आणि अपुरा वेळ झोपणं, दिवसभर पेंगणं हे आज आपल्या जीवनशैलीचं अविभाज्य अंग बनलंय. कामाच्या दबडघ्यामुळे, रात्री वेळेवर झोप मिळणं आणि दुपारी जेवण करून छानपैकी वामकुक्षी घेणं ही आजच्या कार्यप्रवण आबालवृद्धांसाठी एक प्रकारची 'लक्झुरी'च बनली आहे.
दिवसाच्या डुलक्या
कित्येक शाळा-कॉलेजात दुपारच्या लेक्चरला, सार्वजनिक कार्यक्रमात भोजनोत्तर समारंभात, सरकारी-निमसरकारी ऑफिसमध्ये जेवणाच्या सुट्टीनंतर आणि तमाम कॉन्फरन्समध्ये 'पोस्ट लंच सेशन'मध्ये यच्चयावत लोक एखादी तरी क्षणिक डुलकी मारताना आढळतात. काही जण याला 'नॅप' म्हणतात, तर काही 'पॉवरनॅप' या नावानं गौरवतात. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार, दुपारी जेवणानंतरच्या वामकुक्षीबाबत (आफ्टरनून सिएस्टा) काही फायदे आणि बरेच तोटे नमूद केलेले आढळतात.
डुलकीचे फायदे
एकाग्रता सुधारते - 'नासा'नं २००५मध्ये केलेल्या एका अभ्यासपूर्ण संशोधनात दुपारच्या छोट्या झोपेनंतर कामातील एकाग्रता सुधारते, आधी केलेल्या कामाबाबत सुसूत्रता येते असं सिद्ध केलं आहे.
स्मरणशक्ती उत्तम होते - मोठ्या प्रमाणात बौद्धिक काम केल्यावर २०-३० मिनिटं डुलकी घेतली, तर त्या केलेल्या कामातल्या आणि अभ्यासातल्या गोष्टी स्मरणशक्तीत घट्ट रुतून बसतात, म्हणजे चांगल्या लक्षात राहतात, असं स्टीफन गेस आणि जान बॉर्न या शास्त्रज्ञांनी २००४मध्ये दाखवून दिलं आहे.
वृद्धांना उपयुक्त- ज्येष्ठ नागरिकांनी दुपारी थोडा व्यायाम करून त्याला ३० मिनिटांच्या झोपेची जोड दिली, तर ते उर्वरित दिवसांत मानसिकदृष्ट्या ताजेतवानं तर राहतातच, शिवाय त्यांच्या रात्रीच्या झोपेतही उत्तम सुधारणा होते.
हृदयविकार टळतो- दररोज नियमितपणे ३० मिनिटांची 'पॉवरनॅप' घेणाऱ्या व्यक्तींना तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ३७ टक्क्यांनी कमी होते, असं २००७मध्ये 'ग्रीक स्टडी'मध्ये सिद्ध केलं आहे. अर्थात यामध्ये त्या व्यक्तींची एकुणातली तब्येत, आहार, व्यसनं आणि व्यवसाय या बाबींनाही विचारात घ्यायला हवं असं सांगितलं आहे.
तोटेही आहेत!
दुपारची डुलकी ही रात्रीच्या अपुऱ्या झोपेला पर्याय नसते. जागरणामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक दोषांना डुलकी दूर करत नाही. दुपारच्या झोपेमुळे मानसिक सजगता किंवा सतर्कता वाढत नाही. एकाग्रता वाढते; पण डुलकी घेऊन उठल्यावर त्यासाठी थोडा वेळ जातो. या काळात कामावर लक्ष केंद्रित होणं कठीण जातं. कामातील एकाग्रता ही रात्री पुरेशी झोप झाली असेल, तरच साध्य होत असतं.
दुपारची डुलकी ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ झाली असेल, तर ती व्यक्ती अचेतनावस्थेत राहते. म्हणजे साधारणतः अर्धातास ती 'बधीर' असते. तिला काहीही 'सुधरत' नाही. दुपारच्या दीर्घकाळ झोपेतून उठल्यावर त्या व्यक्तीला आता दिवस आहे, की रात्र हा प्रश्न पडतो. बुद्धीला, मनाला आणि शरीराला जडपणा येतो. त्यानंतरच्या कामातला वेग आणि अचूकता कमी राहते.
दुपारची डुलकी २० ते ३० मिनिटंच असेल आणि दररोजच्या दिनचर्येचा ती भाग असेल, तरच ती हृदयविकाराचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरते. आठवड्यातून किमान दोन दिवस 'प्लॅन्ड नॅप' घेतली, तरीही ती उपयुक्त ठरते. मात्र, रात्री झोप न झाल्यानं दिवसभर डुलक्या घेणं आणि दुपारी ३० मिनिटांपेक्षा दीर्घकाळ झोपणं हे हृदयविकारांना आमंत्रण ठरतं, असे यू लेंग आणि क्रिस्टिन याफ या अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे.
थोडक्यात सांगायचं म्हणजे, आहार आणि व्यायामाप्रमाणेच रात्रीची आठ तास झोप यांच्यातली नियमितता हे निरामय आरोग्याचं सूत्र आहे. दुपारी वामकुक्षी घ्यायची असेल, तर ती तीसच मिनिटं घ्या, नियमितपणे घ्या, उगाच रात्रीच्या जागरणाची भरपाई म्हणून पेंगत बसू नका.