
‘अंग्रेजी मीडियम’चे नवे गाणे तुमच्या भेटीला
आगामी ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता इरफान खान रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. त्यातच आता नुकतेच ‘अंग्रेजी मीडियम’चे नवे गाणे रिलीज करण्यात आले आहे. करिना कपूर खान, इरफान खान, राधिका मदन, डिंपल कपाड़िया आणि दीपक डोबरियाल असे दिग्गज कलाकार या गाण्यात झळकले आहेत. ‘लाडकी’ असे या गाण्याचे शीर्षक असून सचिन-जिगर यांनी रेखा भारद्वाज यांच्या आवाजातील हे गाणे संगीतबध्द केले आहे.
या गाण्यात सर्व कलाकार उदास दिसत आहे. बंद खोलीमध्ये करिना जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. तर इरफान खान आपल्या राधिकाचे लहानपणीपासूनच्या प्रवासाच्या आठवणीत रमला आहे. इरफानने या चित्रपटात मुलीचे इंग्रजी शिकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्य पणाला लावणारा बाप साकारला आहे. यात अत्यंत वास्तववादी चित्रण पाहायला मिळते. खुसखुशीत संवाद, मिश्किल विनोद आणि खिळवून ठेवणारे कथानक अंग्रेजी मीडियममध्ये असल्याचे ट्रेलरवरुन स्पष्ट जाणवते.
या चित्रपटात करिना कपूर पोलिसाची भूमिका साकारत आहे. डिंपल कपाडिया यांची देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका पाहायला मिळणार आहे. २०१७ मध्ये आलेल्या ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटाचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सीक्वल आहे. दिनेश विजान यांची ही निर्मिती आहे. आता १३ मार्च २०२० रोजी ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट रिलीज होणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=sla7G5RUwZo&feature=emb_title