हॉलीवूड सेलेब्रिटी टॉम हँक्स आणि त्याच्या पत्नीला करोना
हॉलीवूडचा दोन वेळचा ऑस्कर विजेता अभिनेता टॉम हँक्स आणि त्याची अभिनेत्री पत्नी रीटा विल्सन याना करोनाची लागण झाली असल्याची माहिती टॉम हँक्सने त्याच्या ट्विटर अकौंटवर शेअर केली आहे. त्यानुसार हे दोघे वार्नर ब्रदर्सतर्फे बनविल्या जात असलेल्या एल्विस प्रिस्ले वरच्या एका नाव न ठरलेल्या चित्रपटाच्या शुटींग साठी सध्या ऑस्टेलियात आहेत. या चित्रपटात टॉम, प्रीस्लेचा दीर्घकाळचा मॅनेजर कर्नल टॉम पार्कर याची भूमिका साकारणार आहे.
टॉम हँक्सच्या ट्विटनुसार या दोघा पतीपत्नीला दमल्यासारखे वाटतेय. थोडी सर्दी, खोकला, अंगदुखी आणि रिटाला थोडा ताप आला. सध्या जगभर करोनाचा प्रकोप आहे म्हणून आम्ही दोघानीही आमची करोना टेस्ट करवून घेतली ती पोझिटिव्ह आली आहे. ऑस्टेलियाच्या आरोग्य विभागाला याची माहिती दिली असून आम्ही दोघे त्यांच्या सल्ल्यानुसार काही दिवस एकांतात राहणार आहोत. करोनासाठी योग्य ती सर्व काळजी घेतली जात असल्याचेही त्याने म्हटले आहे.