कोरोना व्हायरसने सध्या जगभरात अक्षरशः दहशत माजवली असून या व्हायरसने आता भारतालाही आपल्या विळख्यात घ्यायला सुरुवात केली असून या विषाणूचे सध्या देशात 700 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
अशात सर्वच बॉलिवूड सेलिब्रेटी सध्या आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण शूटिंग थांबवून घरी थांबले आहे. सध्या देशातही लॉकडाउन करण्यात आले आहे. पण सर्वच सेलिब्रेटी सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांना मदत करताना दिसत आहेत. यासर्वात पहिले नाव दक्षिणात्य अभिनेता प्रभासचे घेतले जात आहे.
‘बाहुबली’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारा प्रभास सध्या स्वतः सुद्धा होम क्वारंटाईनमध्ये आहे. प्रभास काही दिवसांपूर्वीच त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून मायदेशी परतला असून त्याने स्वतःला घरात बंद करुन घेतले आहे. पण असे असतानाही सामाजिक भान ठेवत त्याने कोरोनाग्रस्तांसाठी 3 कोटी पंतप्रधान मदत निधी आणि प्रत्येकी आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मुख्यमंत्री मदत निधीसाठी दान केले आहेत. यानुसार कोरोनाग्रस्तांसाठी प्रभासने एकूण 4 कोटी रुपये दान केले आहेत.
काही दिवसांपूर्वीच प्रभास जॉर्जियामधून भारतात परतला आहे. या ठिकाणी त्याचा आगामी चित्रपट ‘प्रभास 20’चं शूटिंग सुरू होते. या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे सुद्धा दिसणार आहे. जॉर्जियातून परतल्यावर या दोघांनीही खबरदारी म्हणून स्वतःला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन केले आहे.
प्रभासच्या अगोदर साउथ अभिनेता पवन कल्याणने 2 कोटी, त्याचा भाचा आणि अभिनेता रामचरणने 70 लाख, रामचरणचे वडील आणि तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांनी 1 कोटी आणि युवा सुपरस्टार महेश बाबू याने 1 कोटी रुपये मदत निधीमध्ये दान केले आहेत.