महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेससाठी शाहरुखने केली २५ हजार पीपीई किट्सची मदत

Thote Shubham

देशातील प्रत्येकजण कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी आपआपल्या परीने जशी होईल तशी मदत करायला सध्या तयार आहे. यासाठी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत मदतीचा ओघ येऊ लागला आहे. त्यातच याआधी पीएम केअर फंडला बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखने आर्थिक मदत केल्यानंतर त्याने आता आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल २५ हजार पीपीई किट्सचे (‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’) वाटप केले आहे.

 

कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याऱ्या डॉक्टर, नर्सेस यांची सुरक्षा सर्वात आधी महत्त्वाची असल्यामुळे शाहरुखने हे पीपीई किट्स त्यांच्या सुरक्षेसाठी वाटले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शाहरुखच्या या बहुमोलाच्या मदतीसाठी ट्विट करत त्याचे आभार मानले आहेत.

 

२५ हजार पीपीई कीट देऊन शाहरुख खानने जो मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचे त्यासाठी मनापासून आभार. याची आम्हाला कोरोनाविरुद्ध लढा देण्यामध्ये मदत होईल आणि वैद्यकीय उपचार टीमच्या आरोग्याची काळजीदेखील घेतली जाईल, असे ट्विट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

तर त्यांचे शाहरुखनेही आभार मानत सध्याच्या काळात सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले. तुम्ही या किट्ससाठी जी मदत केली त्याबद्दल धन्यवाद. आपण सर्वजण मानवजातीच्या सुरक्षेसाठी एकत्र येऊन लढुया. तुमची मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. तुमची टीम आणि कुटुंबसुद्धा निरोगी व स्वस्थ राहू दे, असे रिट्विट शाहरुखने केले.



वांद्रे येथील आपली चार मजली कार्यालयीन इमारत शाहरुखने मुंबई महापालिकेला विलगीकरणासाठी दिली आहे. शाहरुख आणि गौरीने कोरोना विरोधातील लढाईत मदतीचा हात पुढे केल्याने महापालिकेने त्यांचे विशेष आभार मानले होते. त्याने त्याआधी २ एप्रिल रोजी कोरोनाशी लढा देण्यासाठी पुढाकार घेत मदत जाहीर केली होती.

आपल्या कंपन्या कोलकाता नाइट रायडर, रेड चिलीज एंटरटेनमेंट, मीर फाऊंडेशन आणि रेड चिल्लीज VFX डून सात संस्थांना निधी देत असल्याचे त्याने जाहीर केले होते. त्याचबरोबर ५० हजार पीपीई किट्ससाठी सरकारला निधी, मुंबईतील ५५०० कुटुंबाना तसेच १० हजार लोकांना जेवण, रुग्णालयांसाठी २००० जणांचे जेवण, दिल्लीतील २५०० रोजंदारी कामगार आणि १०० अॅसिड हल्ला पीडितांना किराणा सामान एवढी मदत शाहरुखने जाहीर केली आहे.

Find Out More:

Related Articles: