शांततापूर्ण वातावरणामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीत वाढ – मुख्यमंत्री

     राज्यातील समाज बांधव सर्व सण आनंदाने शांततेत साजरे करतात. त्यामुळे राज्याची प्रगती होत असून राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

     मुंबई पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आझाद मैदान येथील पोलीस क्लबमध्ये आयोजित ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार हुसेन दलवाई, आमदार सर्वश्री राज पुरोहित, अबू आझमी, प्रसाद लाड, वारीस पठाण, अस्लम शेख, अमिन पटेल, पोलीस आयुक्त संजय बर्वे आदी उपस्थित होते.

     मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे राज्याच्या प्रगतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अल्पसंख्याक समाजासाठी शासनाची नेहमी मदतीची भावना असून या समाजातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयाच्या ६०२ अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये ५० टक्के शुल्क शासनातर्फे दिले जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शासन पुढील पाच वर्षांत अल्पसंख्याक समाजाला सर्वतोपरी मदत करुन मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.पोलीस विभाग मुंबईसह राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे काम चांगल्या प्रकारे करत असून गेल्या पाच वर्षातील पोलीस दलाचे काम उत्कृष्ट आहे. यापुढेही ते असेच काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिसांतर्फे निरपराध व्यक्तींवर कोणतीही कारवाई होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

     मुंबईतील कायदा सुव्यवस्था चांगली असल्यामुळे येथे सर्व सण शांततेत व आनंदाने साजरे होतात. गणेशोत्सवात गणेश विसर्जनाच्या वेळी सर्व समाज बांधव सहभागी होतात. त्यामुळे बंधुभाव वाढीस लागतो. राज्यातील सर्व समाजाला राज्य व देश पुढे नेण्यासाठी एकत्र मिळून काम करायचे आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अस्लम शेख यांनी केले. कार्यक्रमात खासदार हुसेन दलवाई, आमदार राज पुरोहित, अबू आझमी, अमिन पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. सहपोलीस आयुक्त विनय चौबे यांनी आभार व्यक्त केले.


Find Out More:

Related Articles: