पुण्यातील सर्व जागा पुन्हा जिंकणार - माधुरी मिसाळ
पुणे -“शहरातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्यासाठी प्राधान्य देणार असून, त्याप्रमाणे संघटनात्मक बांधणी करणार,’ असा विश्वास भाजपच्या नवनियुक्त शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी व्यक्त केला.पक्षाच्या शहराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आमदार मिसाळ बोलत होत्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, नवनियुक्त सरचिटणीस गणेश बिडकर, मुरलीधर मोहोळ, दीपक मिसाळ, गणेश घोष, महापौर मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, जगदीश मुळीक या वेळी उपस्थित होते.
मिसाळ म्हणाल्या, “निवडणुकीच्या तोंडावर पक्षश्रेष्ठींनी लोकप्रतिनिधी आणि संघटनेची दुहेरी जबाबदारी टाकली आहे. पक्षातील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने ती यशस्वीपणे पार पाडू. शिवसेनेसोबत जागा वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे घेतील. तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघातून आपणच उमेदवार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षसंघटनेत काही मतभेत असतील, तर त्याबाबत गैरसमज करून न घेता पदाधिकारी तसेच सदस्यांनी थेट याबाबत आपल्याशी चर्चा केल्यास हे वाद आणि गैरसमज 50 टक्के इथेच संपतील आणि त्याचा पक्षवाढीला फायदा होईल, असेही त्या म्हणाल्या.
तर, “शहराध्यक्ष म्हणून काम करताना सर्वांनी मला सहकार्य केले व प्रेम दिले. त्यामुळे चांगल्या पद्धतीचे संघटनात्मक काम उभे करता आले. नेतृत्वाने टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न मी केला. माधुरी मिसाळ अधिक चांगले संघटनेचे काम करतील, असा विश्वास मावळते शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी व्यक्त केला.