पी. चिदंबरम यांना पुन्हा झटका

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी सध्या सीबीआय कोठडीत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आणखी एक झटका बसला आहे. अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेली पी. चिदंबरम यांच्या याचिकेवरील सुनावणीस नकार देत सुप्रीम कोर्टाने ती फेटाळून लावली.

मात्र, पी. चिदंबरम नियमित जामिनासाठी ट्रायल कोर्टासमोर याचिका दाखल करू शकतात, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. कनिष्ठ न्यायालयाने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने नोंदविलेल्या निरिक्षणामुळे प्रभावित न होता त्यांच्या याचिकेवर निर्णय द्यावा, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

न्यायमूर्ती भानुमति यांच्या खंडपीठाने म्हटले की, अटकेनंतर याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही. मात्र, ते कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करू शकतात.आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी अटक केली होती.

त्यांना अद्याप कोर्टाकडून दिलासा मिळू शकलेला नाही. त्यांचा जामिनासाठी आटापिटा सुरूच आहे. कोर्टाने याआधीही याचिकेत त्रुटी असल्याचे स्पष्ट करून लगेच सुनावणीला नकार दिला होता.

पी. चिदंबरम यांना सीबीआय न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्यांच्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत देखील सीबीआय चौकशी करत असलेल्या प्रकरणात त्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

                                                                 


Find Out More:

Related Articles: