काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश
औरंगाबादच्या सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर आज शिवसेनेत प्रवेश केला. दुपारी साडेबारा वाजता मुंबईत मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ते शिवबंधन बांधून घेतलं. खरंतर सत्तार भाजपमध्ये जाणार अशी काही दिवसांपासून चर्चा होती, मात्र सत्तार यांना भाजपमधून मोठा विरोध होता. यामुळे सत्तार यांना आगामी विधानसभा कठीण गेली असती आणि त्यामुळे सत्तार यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेण्याचं ठरवलं असावं.
महत्त्वाचं म्हणजे युतीच्या नियमानुसार सिल्लोड मतदारसंघ भाजपच्या कोट्यात आहे आणि सत्तार आता शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे मतदारसंघावरून सुद्धा आगामी काळात शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून उमेवारी न मिळाल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार नाराज होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची त्यावेळी भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची काही दिवसांआधी चर्चा होती. औरंगाबादमध्ये काँग्रेसची उमेदवारी सुभाष झांबड यांना जाहीर झाल्यानंतर सत्तार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत बंडाचे निशाण फडकवले होते. त्यानंतर काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
याआधी देखील जून महिन्यात सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. सिल्लोडच्या भाजप नेत्यांचा सत्तार यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होता. त्यांनी प्रसंगी बंडखोरीचा इशाराही दिला होता. त्यामुळे राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशावेळी सत्तार यांनी पक्षप्रवेश टाळला. भाजपला सत्तारांच्या काही अटीही मान्य नव्हत्या, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत चाचपणी सुरू केली होती. अखेर त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.