मोहन भागवत-मौलाना अर्शद यांच्यात सामाजिक सलोख्यासाठी सहकार्यावर चर्चा

Thote Shubham

देशात ध्रुवीकरणाचे वारे वाहत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि जमीयत उलेमा-ए-हिंदचे नेता मौलाना सय्यद अर्शद मदनी यांची भेट झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी देशाची राजकीय परिस्थिती आणि सामाजिक सलोख्यासाठी सहकार्यावर चर्चा केली. 

या बैठकीत सरसंघचालकांनी मदनी यांच्या तमाम प्रश्‍नांची उत्तरे दिली. हिंदुत्व कसे सामाजिक सलोखा राखते, हे त्यांनी सांगितले. दिल्लीतील संघ मुख्यालयात केशव कुंज येथे ही बैठक झाली. भाजपचे माजी संघटन महामंत्री रामलालदेखील उपस्थित होते. ही बैठक सुमारे दीड तास चालली. मदनी यांनी सांगितले, की आम्ही सार्वजनिक व्यासपीठावर सामाजिक सलोख्याच्या संदेशासाठी एकत्र दिसू शकतो; पण जोपर्यंत यासाठी निश्‍चित काही ठरत नाही, तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूत्रांनी सांगितले, की मदनी यांना खूप दिवसांपूर्वीच आमंत्रण दिले होते. त्यांना विज्ञान भवनातील संघाच्या कार्यक्रमालाही बोलावले होते; पण मदनी गोरक्षकांच्या कथित हिंसेचा निषेध म्हणून दूर राहिले. संघही कुठल्याच प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नाही आणि अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आम्ही हे जाहीरपणे सांगितले आहे, असे भागवत यांच्या प्रतिनिधींनी मदनी यांना सांगितले. 

आम्ही नियमितपणे अशा चर्चा करत राहणार आहोत. संघ नेहमी विविध समुदायांच्या नेत्यांना भेटत असतो. हिंदू-मुस्लिम एकतेच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची होती, असे संघाकडून सांगण्यात आले.           

Find Out More:

Related Articles: