
राष्ट्रवादीने वचन न पाळल्यामुळेच हर्षवर्धन पाटील नाराज- बाळासाहेब थोरात
लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, राष्ट्रवादीने ते वचन न पाळल्यामुळे हर्षवर्धन पाटील कमालीचे नाराज झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. त्यांनी गुरुवारी दिल्लीत 'झी २४ तास'शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या नाराजीचे समर्थन केले.
राष्ट्रवादीकडून इंदापूर विधानसभेची जागा पदरात पाडून घेण्यात काँग्रेसला अपयश आल्याने हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी हर्षवर्धन पाटील यांचा बचाव केला.
त्यांनी म्हटले की, हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी इंदापूरची जागा सोडण्याचे वचन लोकसभा निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादीने दिले होते. मात्र, ते पाळले गेले नाही. त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज झाले आहेत. मात्र, त्यांनी भाजपमध्ये जाऊ नये, ही शरद पवारांची इच्छा असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी इंदापूरच्या जागेबाबत शरद पवारांनी नमती भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. शरद पवार ही जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडण्याबाबत सकारात्मक आहेत. त्यासाठी काँग्रेसशी चर्चा करून तोडगा काढण्यात आला आहे. मात्र, सध्या हर्षवर्धन पाटील नॉट रिचेबल असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.