द्यायचेच असतील तर मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या - राज ठाकरे
मुंबई । राज्य सरकारच्या गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची टीका केली आहे. द्यायचेच असतील तर मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या. कारण तसेही केंद्रात दोन आणि महाराष्ट्रात एकाचीच सत्ता चालते, बाकीचे मंत्री काही कामाचे नाहीत, वाटलं तरी काही करूच शकत नाहीत. मग त्यांना घरं तरी कशाला देता?
राज ठाकरे यांनी सरकारचा हा निर्णय केवळ मूर्खपणाचा असल्याचे म्हणत सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, “महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास आहे. मात्र सरकारला याचं काहीच देणंघेणं नाही. जर सरकारला उत्पन्न हवे असेल, तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत. त्यातून त्यांनी पैसे मिळवावेत.
भाजप मशीनच्या मदतीने निवडून येत आहे. त्यामुळे ते लोकांना विचारातही घेत नाहीत.” गड-किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेल करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गड किल्ल्यांना हात लावायची हिंमत करू नका, असा इशाराही राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला यावेळी दिला.