राष्ट्रवादीच्या यादीला ‘गयारामां’मुळे ब्रेक
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचणे शक्य व्हावे, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जुलैमध्येच मुलाखत प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर ऑगस्टमध्ये उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, विद्यमान आमदारांसह अनेक इच्छुक भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर असल्याने निश्चित केलेली यादी बदलण्याची वेळ आली आहे. उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास उशीर होत असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.
गणेशोत्सव होताच आचारसंहिता लागण्याची शक्यता असून 20 ऑक्टोबर (दिवाळीपूर्वी) निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने जुलैमध्येच इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यात विद्यमान आमदारांच्या जागा कायम ठेवून लोकसभा निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे पक्षीय बलाबल, तसेच 2014 मधील मतदानाची स्थिती लक्षात घेऊन जागा वाटपाची चर्चा सुरू करण्यात आली.
ज्या जागांची चर्चा पूर्ण होईल, तेथील उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेस ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच जाहीर करणार होती. मात्र, याद्या तयार होताना पक्षाचे अनेक विद्यमान आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यामुळे यादी तयार असतानाच उमेदवारांनी पक्ष सोडल्याने पर्यायी उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. तसेच अनेक जण अजूनही पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे यादी जाहीर केली आणि उमेदवार निघून गेला, तर काय? अशी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या याद्या थांबविण्यात आल्या आहेत.