इंदुरीकर महाराज निवडणूक लढवण्याची चर्चा, थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना भिडणार?
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti Maharaj Indurikar) निवडणूक लढवण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. नगर जिल्ह्यात इंदुरीकर महाराजांची (Nivrutti Maharaj Indurikar) जोरदार चर्चा सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे इंदुरीकर महाराज थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची चर्चा आहे.
भाजपची महाजनादेश यात्रा काल नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये होती. त्यावेळी व्यासपीठावर इंदुरीकर महाराज उपस्थित होते. तेव्हापासून या चर्चांना उधाण आलं आहे.इंदुरीकर महाराज यांनी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुफ्तगू केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या. मात्र टीव्ही 9 मराठीने इंदुरीकर महाराजांशी संपर्क साधला असता, त्यांनी ही चर्चा खासगी असल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संगमनेरमधील महाजनादेश यात्रेला उपस्थित राहून किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांचं योगदान दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हात जोडून इंदुरीकर महाराजांचे आभार मानले.
नगर जिल्हयातील अकोले, संगमनेर आणि राहुरी येथे जाहीर सभा, तर महाजनादेश यात्रेच्या मार्गावरही ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.