मराठी माणसावर हाथ उचलणाऱ्या गुजरात्याला मनसेचा दणका

Thote Shubham

मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच लढत असते. मनसे मराठी माणसावर अन्याय झाल्यास लगेचच आवाज उठवताना आपण पाहिले आहे. आता ठाण्यात अशीच एक घटना घडली आहे. ठाण्यातील मराठी माणसावर हात उचलणे एका गुजराती माणसाला चांगलाच महागात पडले आहे. मनसेने या गुजराती माणसाला चांगलाच दणका दिला आहे. ठाण्यातील नौपाडा येथील एका सोसायटीतील दोन व्यक्तींमध्ये झालेल्या वादात मराठी विरूद्ध गुजराती अशी भूमिका पाहायला मिळाली.

नौपाड्यातील सुयश अपार्टमेंटमध्ये राहुल पैठणकर आणि हसमुख शहा हे दोघेही राहतात. ११ सप्टेंबरला राहुल पैठणकर यांच्याकडून चुकून लिफ्टचा दरवाजा अर्धवट उघडा राहिला. हसमुख शहा यांनी यावरून राहुल आणि त्यांच्या घरातील सदस्यांना अर्वाच्य भाषेचा वापर करत शिवीगाळ केली. त्यावर दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाला. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

त्यानंतर एकमेकांविरोधात दोघांनीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला असता व्हिडिओत दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे दिसते. त्याचवेळी या वादात मनसेने उडी घेतली आणि मराठी माणसाला मारहाण केल्यामुळे संताप व्यक्त केला आहे.

या व्हिडिओची दखल मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी घेतली आणि हसमुख शहा यांना गाठले. जिथे हसमुख शहा भेटेल तिथे त्याला मारल्याशिवाय गप्प बसणार नसल्याची संतप्त प्रतिक्रीया जाधव यांनी दिली होती. अविनाश जाधव यांनी त्यानंतर आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हसमुख शहा हे या व्हिडिओत कान पकडून मराठीत माफी मागताना दिसत आहे.

अविनाश जाधव या व्हिडिओत आपण हसमुख यांना अद्दल घडवणार असल्याचे म्हणत, महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा मान ठेवलाच पाहिजे असेही म्हणताना दिसत आहे. तसेच मला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॅमेऱ्यासमोर शिवी देऊ नको आणि मारहाण करू नको असे सांगितले असल्यामुळे कॅमेरा बंद झाल्यानंतर जे काही करायचे आहे आणि ते मी करणार असल्याचे अविनाश जाधव बोलतात आणि व्हिडिओ तिथेच थांबताना दिसतो. दरम्यान राहुल पैठणकर आणि हसमुख शहा यांच्या विरोधात या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Find Out More:

Related Articles: