आगामी दोन दिवसात होऊ शकते विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा

Thote Shubham

याच महिन्याच्या १९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. आज मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा, आयुक्त अशोक लवासा आणि सुशीलचंद्र येत आहेत. मंगळवारी आणि बुधवारी सलग दोन दिवस आयोगाच्या वतीने बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. राज्य विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो आहे, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आणि अन्य दोन आयुक्त मुंबईत येऊन दोन दिवस संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीची माहिती घेणार आहेत. गृहविभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांचीही बैठक घेऊन निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाईल याबाबतचा आढावा घेतला जाईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना सर्वात आधी जाहीर होईल. तर झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी अनेक टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम २० सप्टेंबर रोजी जाहीर झाला होता. तर १५ ऑक्टोबरला मतदान झाले होते.

दरम्यान, याच दिवशी शिवसेना-भाजप युतीची घोषणाही होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये १९ सप्टेंबरला महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. यावेळी युतीची घोषणा होऊ शकते.


Find Out More:

Related Articles: