केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात आर्थिक मंदी : डॉ. भालचंद्र मुणगेकर
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेे आज देशात आर्थिक मंदी निर्माण झाली असून त्यावर मात करण्यासाठी देशभरातील स्वतंत्र अर्थतज्ज्ञांची गोलमेज परिषद बोलावून देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा घडवून आणण्याची मागणी ज्येष्ठ अर्थतज्ञ् आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना केली.
या परिषदेत सुचवण्यात येणार्या उपायांची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास ही आर्थिक मंदी अधिक तीव्र होऊन त्याचा विपरीत परिणाम देशाच्या संपूर्ण अर्थ व्यवस्थेवर होईल असा इशारा त्यांनी दिला. सध्याच्या परिस्थितीत केवळ खासगी गुंतवणुकीवर अवलंबून न राहता सरकारी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची गरज आहे.
त्याचबरोबर वाहन उद्योगाला वस्तू आणि सेवाकरातून सवलती दिल्या पाहिजेत. आरोग्य आणि शिक्षणावरील सरकारी खर्चात वाढ केली पाहिजे ज्यायोगे सर्वसामान्य माणसांची क्रयशक्ती वाढून बाजारपेठेतील कमी झालेली मागणी वाढण्यास मदत होईल अशा विविध उपाय योजना डॉ . मुणगेकर यांनी सुचवल्या.