
आम आदमी पक्ष पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेच्या रिंगणात, 8 उमेदवार जाहीर
तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर केली. राज्यभरातून इच्छुकांचे अर्जांची राज्य पक्ष कार्यालयात छाननी प्रक्रिया सुरू आहे. पक्षाची केंद्रीय स्तरावरील पॉलिटिकल अफेअर्स कमिटी यांच्याशी सल्लामसलत करून राज्य प्रचार समितीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
आम आदमी पक्षाचा 'स्वच्छ राजकारण' आणि अशी 'नवी राजकीय संस्कृती' बनवण्यावर भर आहे. यामध्ये नागरिकांचे मूलभूत गरजेचे मुद्दे हे केंद्रस्थानी असतील. समाजामधील हुशार, कर्तबगार, उत्तम चारित्र्याच्या आणि जनतेसाठी खऱ्या अर्थाने जमिनीवर उतरून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना तिकीट देऊन जनतेला खरे प्रतिनिधीत्व देण्यावर आम आदमी पक्षाचा विश्वास आहे.
महाराष्ट्रातील सर्व राजकीय अवकाश हा भाजप आणि शिवसेना यांच्या वर्चस्ववादी राजकारणाने व्यापला गेला आहे. त्याचबरोबर सक्षम राजकीय विरोधकांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेचा आवाज, आकांक्षा राजकारणामध्ये प्रतिबिंबीत होत नाही.
याचा सबळ पुरावा म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित विरोधी पक्षातील नेते हे सत्ताधारी पक्षांमध्ये सामील होत आहेत. त्याच्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने अर्थाने विरोधकांची मोठी पोकळी तयार झाली आहे.
आम आदमी पक्ष हा देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारा राजकीय पक्ष असून अल्पावधीतच दिल्लीमध्ये या पक्षाने आपले सरकार स्थापन केले, पंजाब मध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे आणि गोवा राज्यामध्ये लक्षणीय वोट शेअर कमावला आहे.
दिल्लीमध्ये लोकांना सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देण्याचे अनेक उच्चस्तरीय आदर्श आम आदमी पक्षाने प्रस्थापित केले आहेत. त्यामुळेच अल्पावधीत 'गव्हर्नन्स'बाबत स्वतःचा अनोखा ब्रँड तयार करण्यामध्ये आम आदमी पक्षाला यश आले आहे.
भाजप-शिवसेना सरकारला गेल्या पाच वर्षांमध्ये जनताभिमुख कारभार करण्यामध्ये आलेले अपयश आणि या अपयशाबद्दल सरकारला धारेवर धरून जनतेचे खरे मुद्दे मांडण्यात कमी पडलेले विधानभवनातील विरोधी पक्ष यामुळे जनतेला त्यांचा खरा आवाज राज्याच्या राजकारणामध्ये मिळवून देण्यासाठी आम आदमी पक्ष ही विधानसभा निवडणूक लढवत आहे.
पहिल्या यादीतील उमेदवार...
1. पारोमिता गोस्वामी (49) (ब्रम्हपुरी विधानसभा, चंद्रपूर जिल्हा)
2. विठ्ठल गोविंद लाड (57) (जोगेश्वरी पूर्व विधानसभा, मुंबई)
3. डॉ.आनंद गुरव (40) (करवीर विधानसभा, कोल्हापूर जिल्हा)
4. विशाल वडघुले (29) (नांदगाव विधानसभा, नाशिक जिल्हा)
5. डॉ अभिजित मोरे (35), (कोथरूड विधानसभा, पुणे जिल्हा)
6. सिराज खान (47), (चांदीविली विधानसभा, मुंबई)
7. दिलीप तावडे (61), (दिंडोशी विधानसभा, मुंबई उपनगर)
8. संदीप सोनावणे (32),(पर्वती विधानसभा, पुणे जिल्हा)