भारत भालके यांचा काँग्रेसचा हातसोडत राष्ट्रवादीेत प्रवेश
पंढरपुरचे विद्यमान आमदार भारत भालके यांनी कॉंग्रेस पक्षाला राम राम करत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भारत भालके यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे पी.एस सागर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर भारत भालके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेले काही दिवस भारत भालके हे भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र भारत भालके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मार्ग धरत निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भालके यांना मुंबईला बोलावून घेतले होते. मात्र भाजपची सोमवारी सकाळी मेगा भरती झाली. यात भालके यांचा समावेश नव्हता. त्यामुळे भारत भालके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान दुसरीकडे पंढरपूर विधानसभेची जागा भाजपचा मित्र पक्ष रयत क्रांती संघटनेला सोडणार असल्याची चर्चा आहे. रयत क्रांती संघटनेकडून माजी आमदार सुधाकरपंत परिचारक उमेदवार असतील, अशी माहिती समोर येत आहे. सोमवारी सायंकाळी परिचारक यांच्या उमेदवारीची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे.