“उद्धवसाहेब माफ करा, यावेळी आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला”आपला कट्टर शिवसैनिक
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती झालेली असून घाटकोपरची जागा भाजपाकडे देण्यात आली आहे. भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली असून घाटकोपर पश्चिमेतून राम कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
यावरुन शिवसेना कार्यकर्ते नाराज झाले असून उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. घाटकोपरमधील एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजपाला मतदान करणार नसल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे.
या पोस्टरमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ‘माननीय उद्धवसाहेब…जय महाराष्ट्र !! किरीट सोमय्याने तुमच्यावर वैयक्तिक आरोप केले होते. आपण त्याला सेना भाजपाची युतीची उमेदवारी मिळू दिली नाही. तेव्हा आम्हाला खुप अभिमान वाटला !!! आण महिलांना अपमान करणाऱ्या राम कदमला कोणत्याच पक्षाने उमेदवारी देऊ नये अशी आपली ठाम भूमिका होता.
पण आज भाजपाने युतीची घाटकोपरची उमेदवारी त्याला दिली. साहेब माफ करा…यावेळी भाजपाला मतदान नाही. आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला’. या पोस्टरच्या शेवटी घाटकोपरचा कट्टर शिवसैनिक असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान मनसेकडून घाटकोपर पश्चिम येथून गणेश चुक्कल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
घाटकोपर येथे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात मुलगी पळवून आणण्याचे वादग्रस्त वक्तव्य राम कदम यांनी केलं होतं. ‘एखादी मुलगी पसंत असेल तर त्या मुलीला पळवून आणण्यात तुम्हाला मदत करेन’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. यासाठी त्यांना राज्य महिला आयोगाकडे बिनशर्त माफी मागावी लागली होती.