राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दीना यांचा शिवसेनेत प्रवेश
आजी-माजी आमदारांच्या आऊटगोईंग-इनकमिंगनंतर आता राष्ट्रवादीच्या माजी खासदारानेही शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दीना पाटील यांनी शिवबंधन बांधलं. मुंबईतील राष्ट्रवादीला यानिमित्ताने मोठं भगदाड पडलं आहे. कारण, मुंबई राष्ट्रवादीचा चेहरा सचिन अहिर यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता.
एका नवीन विचारधारेत आपण प्रवेश केला असून शिवसेनेसाठी काम करत राहिन, अशी प्रतिक्रिया संजय दीना पाटील यांनी दिली. संजय दीना पाटील यांनी 2009 मध्ये ईशान्य मुंबईतून विजय मिळवला होता. 2014 ला भाजपचे किरीट सोमय्या यांनी आणि त्यानंतर 2019 ला भाजपच्या मनोज कोटक यांनी संजय दीना पाटील यांचा पराभव केला.
संजय दीना पाटील यांचा शिवसेनेला मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात फायदा होऊ शकतो. कारण, या मतदारसंघात लोकसभेला त्यांनी चांगली मतं मिळवली होती. मानखुर्दमधून शिवसेनेने विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी दिली आहे. या लोकसभा निवडणुकीत संजय दीना पाटील यांनी जवळपास 3 लाख मतं मिळवली होती. मात्र मनोज कोटक मोठ्या फरकाने विजयी झाले होते.
दरम्यान, संजय दीना पाटील यांचा शिवसेना प्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांपैकी एक उरलेले संजय दीना पाटीलही शिवसेनेच्या गळाला लागले. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले सचिन अहिर यांनी यापूर्वीच शिवबंधन बांधलं होतं.