सीमा सावळेंसह भाजपच्या आणखी 10 बंडखोरांची हकालपट्टी
मुंबई : महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी करणाऱ्या 4 बंडखोरी करणाऱ्यांना भाजपाने गुरुवारी घरचा रस्ता दाखवला असतानाच शुक्रवारी आणखी 10 बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यात पिंपरी चिंचवडमधील नगरसेविका सीमा सावळे यांचा समावेश आहे.
शिवसेना-भाजपची युती झाल्याने दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांना निवडणुकीतून माघार घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, बंडखोरांनी नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पक्षाने बंडखोरांवर कारवाई सुरू केली आहे.
गोंदियात बंडखोरी व पक्षविरोधी कारवाई केलेले भाजपचे पदाधिकारी विनोद अग्रवाल, भाऊराव उके, रतन वासनिक, छत्रपाल तुरकर, अमित बुद्धे यांच्यासह पिंपरी-चिंचवड येथील सीमा सावळे, दक्षिण नागपूर येथील सतीश होले, मेळघाट येथील अशोक केदार, गडचिरोली जिल्यातील गुलाब मडावी आणि यवतमाळ मधून राजू तोडसम (आर्णी) यांना पक्षातून काढून टाकले आहे.