मतदान करा आणि हॉटेल, रिसॉर्टमध्ये भरघोस सूट मिळावा
मतदारांनी मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून लढवल्या जातात. नागपूर प्रशासनाने विधानसभेसाठी असाच एक अभिनव उपक्रम केला आहे. मतदान करा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प असलेल्या परिक्षेत्रातील रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये भरघोष सूट मिळवा अशी युक्ती लढवली आहे.
येत्या 21 ऑक्टोबरला राज्यात विधानसभेसाठी मतदान करा आणि दुसऱ्या दिवशीपासून पेंच प्रकल्पाच्या परिक्षेत्रात फिरायला निघा. या ठिकाणी राहण्याची किंवा खाण्याची चिंता करु नका.
कारण या परिक्षेत्रातील एमटीडीसीसह इतर कोणत्याही रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये तुम्हाला 10 टक्क्यांपासून 25 टक्के सूट मिळू शकते. मतदान केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत ही ऑफर असणार आहे.
नागपूरमध्ये रामटेक परिक्षेत्रात पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी धार्मिक स्थळ सुद्धा आहे. शिवाय एमटीडीसीपासून खासगी मोठे रिसोर्ट आणि हॉटेल्सही पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि हॉटेल असोसिएशनने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
मतदानाच्या दिवशी अनेकजण मतदान न करता सुट्टीची मजा लुटतात. यामुळे प्रशासनाने ही युक्ती शोधली आहे. ज्यामुळे मतदान करुन मतदार फिरायला निघतील. यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईलचं शिवाय याचा पर्यटनालाही फायदा होईल.