शिवछत्रपतींसमोर विराटला व्हायचे आहे नतमस्तक
पुणे – नुकतीच पुण्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी महाराज भोसले यांची भेट झाली. विराटने या भेटीत संभाजी महाराजांकडे रायगड किल्ला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. संभाजी महाराजांनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिली आहे.
पुण्यातील गहुंजे मैदानात भारत-दक्षिण आफ्रिका संघामध्ये दुसरा कसोटी सामना पार पडला. भारताने या सामन्यात १ डाव १३७ धावांनी आफ्रिकेचा पराभव केला. विराटने या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर संभाजी महाराजांची भेट घेतली. त्याने या भेटीदरम्यान रायगड किल्ला पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
आपल्या या भेटीचे फोटो छत्रपती संभाजी महाराजांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विराटबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील क्रिकेटबद्दलही चर्चा केली असल्याचे सांगत त्यांनी या पोस्टमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती सदस्य जतीन परांजपे यांनी ही भेट घडवून आणली असल्याचे सांगितले.
जतीननी आमच्या भेटीआधी माझ्या सामाजिक कार्याविषयी आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांसाठी मी करत असलेल्या कामाची माहिती सांगून ठेवली असेल, यामुळे कदाचित. विराटने स्वतः होऊन रायगड किल्ल्यावर येण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे संभाजी महाराज यांनी सांगितले.
पुणे येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने नाबाद २५४ धावांची द्विशतकी खेळी केली. विराट सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. ३ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने दोन सामन्यांनंतर २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना १९ ऑक्टोबरपासून रांची येथे होणार आहे.