तुमच्या ‘ईडी’चे येड पळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – शरद पवार
पंढरपूर – राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आज पंढरपूर येथे पार पडली. यावेळी बोलताना चितपट कुस्ती खेळणार्या पैलवानांची फळी राज्यात ठिकठिकाणी तयार केली असल्यामुळे येत्या 21 तारखेच्या मतदानानंतर 24 तारखेला कळेल की यावेळी लोकांचा मुड काही वेगळाच होता, अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाच्या सत्ता स्थापन करण्याच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले.
जिथे जातात तिथे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात या निवडणुकीत काही दमच नाही. तेल लावून आमचे पैलवान तयार आहेत, परंतु आम्हाला कोण पैलवानच दिसत नाही. त्याचे उत्तर आम्ही कुणाशीही कुस्ती खेळत नसतो, असे दिले होते. तुम्ही कुठलातरी धरुन आणलेला पैलवान समोर आणता आहात, कुस्तीगीर संघटनेचा मी अध्यक्ष आहे. जिल्ह्या-जिल्ह्यात तालुक्या-तालुक्यात पैलवान तयार करण्याचे काम न बोलता गेले अनेक वर्षे करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
पंढरपुरात मी अनेक वेळा आलो, पण आजचे चित्र काही औरच आहे. तुमचे ठरले वाटते, असे शरद पवार यांनी विचारताच सभेला जमलेल्या समुदायाने भारत भालके यांचे नाव जोरजोरात ओरडत सांगितले. महाराष्ट्राचा मी दौरा करतो आहे, जाहीर सभा घेत आहे. आज सर्वात पुढे तरुण पिढी दिसत आहे. नाहीतर काही ठिकाणी बाप एकीकडे आणि पोरगा दुसरीकडे. त्यामुळे आता बापानेच ठरवले पोरग म्हणते तेच खरे. त्यामुळे या दोघांची शक्ती संपुर्ण महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या पाठीशी उभी राहिलेली दिसत असल्याचे शरद पवार म्हणाले.
तसेच, अमित शहा या सोलापूरात येऊन गेले. गृहखात्याबद्दल ते काही सांगतील असे वाटले होते, परंतु ‘पवार साब ने महाराष्ट्र के लिए क्या किया’ अशी त्यांनी भाषणाची सुरुवात केली. यांनी दिवे लावले आणि आम्हाला विचारतात आम्ही काय केले, अशी खोचक टिकाही शरद पवार यांनी केली. आम्ही महाराष्ट्रात शेतीउदयोग उभे केले, महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था उभ्या करण्याचे काम केले, समाजातील सर्व घटकांना सवलती देण्याचा प्रयत्न केला, राज्य चालवत असताना सर्वांच्या हिताची जपणूक केली. मग त्यामध्ये स्त्रियांना 50 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थानात पहिल्यांदा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.