मतदान केंद्र परिसरातील इंटरनेट बंद करा, राष्ट्रवादीची मागणी

Thote Shubham

मुंबई : मतदान आणि मतमोजणी दरम्यान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट इंटरनेटद्वारे हॅक होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिंग बुथ आणि स्ट्रॉन्ग रुमच्या 3 किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट बंद ठेवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मतदानाच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच 20 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाला पत्राद्वारे ही विनंती केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आठ कोटींपेक्षा जास्त मतदार मतदान करणार आहेत.

त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. ही निवडणूक ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हॅक होण्याची शक्यता आहे, असं या पत्रात म्हटलं गेलं आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हॅक केलं जाऊ शकतं. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत म्हणजेच 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या काळात सर्व पोलिंग बुथ आणि स्ट्रॉन्ग रुम्सच्या बाहेर 3 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून नेहमीच मतदानात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरला. सत्ताधारी पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी ईव्हीएम हॅक करत असल्याचा आरोपही अनेकदा राष्ट्रवादीने केला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही सत्ताधारी पक्ष ईव्हीएमचा चुकीचा वापर करण्याची शक्यता राष्ट्रवादीकडून वर्तवण्यात आली आहे.         


Find Out More:

Related Articles: