युतीचा फायदा कोणाला? राज विजयापासून 'वंचित'? एक्झिट पोलची दहा वैशिष्ट्यं
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी राज्यभरात काल मतदान प्रक्रिया पार पडली. निकालास दोन दिवसांचा अवधी असताना जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी अनेक वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. सर्वच एक्झिट पोलची वैशिष्ट्य एकाच ठिकाणी वाचणं रंजक ठरणार आहे.
टीव्ही 9- सिसेरो यांच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 123, तर शिवसेनेला 74 जागा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजे या एक्झिट पोलनुसार ‘अब की बार 200 पार’ चा नारा पार करण्यातही महायुती काही पावलं मागे राहण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस 40 आणि राष्ट्रवादी 35 जागा मिळवत शिवसेनेने एकट्याने मिळवलेल्या जागांची बरोबरी करेल, असा अंदाज आहे.
टीव्ही 9 सिसेरो एक्झिट पोलचा अंदाज 2019
भाजप – 123
शिवसेना – 74
काँग्रेस – 40
राष्ट्रवादी – 35
मनसे – 00
इतर – 16
महाआघाडी आणि महायुतीला किती जागा?
महायुती – 197
महाआघाडी – 75
इतर – 16
एकूण – 288
जागांचा हा अंदाज दुपारपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरुन वर्तवण्यात आला आहे. अंतिम आकडेवारी आल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बदल होईल. हा अंदाज आहे, अंतिम निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर होईल.
1. भाजपशी युती केल्याचा फायदा शिवसेनेला जास्त – शिवसेना आणि भाजपने लोकसभा निवडणुकांपासूनच महायुती केली आहे. विधानसभेसाठी शिवसेनेने स्वबळावर लढण्याची चाचपणी केल्याची चर्चा आहे. परंतु तसं न करणंच शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कारण भाजपशी युती केल्याचा फायदा शिवसेनेला जास्त झाल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार दिसत आहे.
2. शिवसेनेशी युती केल्याने भाजपला तुलनेनं कमी फायदा – जसं युतीचा फायदा शिवसेनेला झाल्याचं दिसतं, तसंच युतीचा फारसा फायदा भाजपला झालेला दिसत नाही. कारण स्वबळावर भाजपने निवडणूक लढवली असती, तरी भाजपने 123 पेक्षा जास्त आकडा गाठला असता, कदाचित स्वबळावर सत्ताही स्थापन केली असती, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवला जात आहे.
3. शरद पवारांच्या तुफानी प्रचारानंतरही राष्ट्रवादीचं बळ घटणार – अनेक आमदारांनी साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. निवडणुकांच्या आधीपासूनच पवारांचा झंझावात पाहायला मिळाला असला, तरी गेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत राष्ट्रवादीचं बळ घटण्याचीच शक्यता एक्झिट पोलच्या आकडेवारीमध्ये दिसत आहे.
4. काँग्रेसलाही फटका बसणार, मात्र नेतृत्वाविना लढतानाही अस्तित्व टिकवलं – फक्त राष्ट्रवादीच नाही, तर महाआघाडीतील दुसरा मोठा पक्ष काँग्रेसलाही विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची चिन्हं आहेत. परंतु राहुल गांधी यांनी केवळ दोन सभांवर पिटाळून लावलं, अध्यक्षा सोनिया गांधी किंवा प्रियांका गांधी यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली असतानाही, काँग्रेसला टिकाव धरता आला आहे. लोकसभेनंतर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि बाळासाहेब थोरातांच्याहाती धुरा सोपवली गेली. त्यानंतर काँग्रेसला उभारी मिळाली नसली, तरी पडझड रोखण्यात यश आल्याचं एक्झिट पोलच्या आकड्यानुसार दिसत आहे.
5. राज ठाकरे गरजले, पण मते बरसली नाहीत – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ता नाही, पण विरोधीपक्षाची जबाबदारी देण्याची अनोखी मागणी यंदा प्रचारादरम्यान केली. ‘लाव रे तो व्हिडीओ’ सारखा फंडा यावेळी वापरला नसला, तरी राज ठाकरे जिथे जातील तिथे गरजले. भाजप-शिवसेना या सत्ताधाऱ्यांवर त्यांनी तोंडसुख घेतलं. मात्र राज ठाकरेंवर मतं बरसल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत नाही. सभांना आलेली गर्दी मतात परिवर्तित होत नसल्याचं मनसेच्या बाबतीत पुन्हा दिसत आहे. गेल्या वेळी निवडून आलेला एकमेव आमदारही शिवसेनेच्या गळाला लागल्यानंतर मनसेला यंदा भोपळाही फोडतान येण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये (Maharashtra Assembly Exit poll 2019) वर्तवण्यात आली आहे.
6. वंचित बहुजन आघाडी विजयापासूनही वंचितच – एक्झिट पोलनुसार वंचित बहुजन आघाडीला विजयासाठी धडपड करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’चे खासदार निवडून आले नसले, तरी उमेदवारांनी पुष्कळ मतं खाल्ल्यामुळे विधानसभेला वंचित चांगली कामगिरी बजावेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. वंचितचे दोन आकडी उमेदवार निवडून येतील, असं वाटत असतानाच एक्झिट पोलमध्ये मात्र वंचित ही किंचितशी वंचितच राहिल्याचं दिसत आहे.
7. एमआयएमची बळ टिकवताना दमछाक – एमआयएमचंही विधानसभा निवडणुकांमध्ये आपलं बळ टिकवताना घामटं निघण्याची चिन्हं आहेत. औरंगाबादेतून इम्तियाज जलील खासदारपदी निवडून गेल्यानंतर त्यांना आपली जागा टिकवण्याचं आव्हान आहे. तर मुंबईतील भायखळ्याचा गड राखण्यासाठी वारिस पठाण यांना चौरंगी लढत द्यावी लागत आहे.
8. अपक्षांना मतदारांचा चांगला प्रतिसाद – विधानसभा निवडणुकीत राजकीय उड्यांमुळे बंडखोरीचं प्रमाण वाढलं होतं. त्यामुळे तिकीट कापल्या गेलेल्या अनेक नाराजांनी बंडखोरी केली. या बंडखोर अपक्ष उमेदवारांना त्यांच्या समर्थकांनी आणि मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीत दिसत आहे.
9. मुंबईकरांचा कौल पुन्हा एकदा महायुतीलाच – गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून काँग्रेसचे पाच, तर समाजवादी पक्षाचा एकच आमदार निवडून आला होता. राष्ट्रवादीला मुंबईत खातंही उघडता आलं नव्हतं. 36 पैकी 29 जागांवर गेल्यावेळी शिवसेना आणि भाजप यांची एकूण विजयी पताका झळकली होती. आता काँग्रेसचा एक आमदार महायुतीच्या गोटात सामील झाल्यानंतर महायुतीचं बळ वाढल्याचंच दिसत आहे. लोकसभेला सहाच्या सहा जागा महायुतीला मिळाल्यानंतर विधानसभेतही मुंबईकरांचा कौल पुन्हा सेना-भाजपला मिळण्याची चिन्हं आहेत.
10. राज्यातील सर्वच विभागांमध्ये महायुतीचा प्रभाव – मुंबई असो वा विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही महायुतीचा डंका आहे. राज्यातील बहुतांश प्रदेशात महायुतीलाच महाआघाडीच्या तुलनेत अधिक जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये (Maharashtra Assembly Exit poll 2019) वर्तवली गेली आहे.
इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया एक्झिट पोल
- भाजप – 109 ते 124
- शिवसेना – 57 ते 70
- काँग्रेस – 32 ते 40
- राष्ट्रवादी – 40 ते 50
- वंचित – 0-2
- इतर – 22 ते 32
न्यूज18- IPSOS एक्झिट पोल (Maharashtra Assembly Exit poll 2019)
- भाजप (+) – 243
- भाजप – 141
- शिवसेना – 102
- काँग्रेस (+)
- काँग्रेस – 17
- राष्ट्रवादी – 22
- इतर – 02
- वंचित –
- एमआयएम – 01
- मनसे –
- इतर – 03
एबीपी-सी वोटर्स
- युती – 216 +
- आघाडी – 81
झी-पोल डायरी
- भाजप – 121 ते 128
- शिवसेना – 55 ते 64
- राष्ट्रवादी – 35 ते 42
- काँग्रेस – 39 ते 46
- इतर – 3 ते 27
NDTV (विविध चॅनल्सच्या आधारे)
- युती – 211
- आघाडी – 64
टाईम्स नाऊ
- भाजप – 135
- शिवसेना – 81
- काँग्रेस – 24
- राष्ट्रवादी – 41
- इतर – 07
- युती – 230
- आघाडी – 48
- इतर – 10
इंडिया टीव्ही
- युती – 204
- आघाडी – 69
- इतर – 15
सीएनएन न्यूज 18
- युती – 243
- आघाडी – 41
- इतर – 04
जन की बात
- युती – 223
- आघाडी – 54
- इतर – 14
(Maharashtra Assembly Exit poll 2019)
TV9 मराठी