दिवाळीनंतर अजित दादांसोबत मी विधानसभेत असेल : रोहित पवार

Thote Shubham

पुणे : विधानसभेच्या रणधुमाळीत उमेदवारांनी दिवसाची रात्र करत आपला मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. या सगळ्यात उमेदवारांना आपल्या कुटुंबीयांना वेळही देता आला नाही. मतदान संपल्यानंतर सर्व उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं. निकाल 24 तारखेला लागणार असल्याने मनाची होणारी धाकधूक थोडी बाजूला ठेवत, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी कुटुंबीयांसह वेळ घालवला आणि विजयाचा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या राजकारणातील आश्वासक युवा चेहरा म्हणून रोहित पवार ओळखले जातात. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू म्हणून त्यांची विशेष ओळख. बारामती हा आपला बालेकिल्ला सोडून रोहित थेट कर्जत-जामखेडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. गेली पाच-सहा महिने रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे आपली लाडकी मुलगी आनंदीता आणि मुलगा शिवांश यांना त्यांना वेळ देता आला नाही. निवडणुकीच्या धामधुमीत अडकलेल्या डॅडावर आनंदीताने अनेक प्रश्नांची सरबत्ती केली.

लाडक्या लेकीच्या प्रश्नांची उत्तरं दिल्यावर निकालाआधी मिळालेला वेळ हा पूर्णपणे कुटुंबीयांसोबत घालवणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. तर निवडणूक आयोगाने दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्याची संधी दिल्याचं सांगत अजित दादांसोबत सभागृहात बसण्याचा आनंद वेगळाच असेल, असेही रोहित पवार म्हणाले.

एकीकडं रोहित पवार गेली पाच महिने निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असताना त्यांच्या पत्नी कुंती यांनी घर, कुटुंब आणि निवडणूक प्रचार या तिन्ही आघाड्या यशस्वी सांभाळल्या. मुलांना सांभाळत प्रचारासाठी बाहेर पडताना लोक ज्या आनंदाने स्वागत करत होते, ते पाहता आपल्या पतीचा विजय नक्की असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

यंदाची दिवाळी ही नेहमीप्रमाणे गोविंदबागेत संपूर्ण कुटुंबीयांसोबत रोहित पवार साजरी करणार आहेत. महाराष्ट्रातील तरुणाला राजकीय भानाबरोबरच सामाजिक दिशा देणं आवश्यक आहे, त्यासाठी आपण काम करणार असल्याचं ते सांगतात.


Find Out More:

Related Articles: