साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न जपणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला – शरद पवार
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुतीने 162 जागांवर आघाडी घेतली होती. महाआघाडीने 97 जागांवर आघाडी घेत गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जोरदार कमबॅक केले आहे. निवडणुकीत वंचित आणि मनसे यांचा फार प्रभाव दिसल्याचे दिसला नाही. मात्र अस असलं तरी आघाडीने अपेक्षापेक्षा जास्त प्रभाव पाडला आहे.
दरम्यान, ‘ज्यांनी पक्षांतरं केली, अशा लोकांसंबंधीची जनतेनं नकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. लोकसभेची एकच जागा होती. त्या जागेकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. श्रीनिवास पाटील एकेकाळचे संसदपटू होते. एका राज्याचं राज्यपालपद त्यांनी सांभाळलं आहे. त्यांना प्रशासनाचा आणि संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. त्यामुळे सातारच्या जनतेनं त्यांना चांगल्या मतांनी विजयी केलं आहे’, तर साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न जपणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
तसेच, ‘मी सातारच्या जनतेचा आभारी आहे. उद्या सातारला जाऊन तिथल्या जनतेचे आभार मानण्याचा प्रयत्न करणार आहे’, असं देखील ते म्हणाले. ‘ज्यांना चारच महिन्यांपूर्वी लोकांनी निवडून दिलं होतं, त्यांनी पदाचा राजीनामा देणं आणि पुन्हा निवडणुकीला उभं राहणं याला जनतेनं नाकारलं आहे’, असं देखील शरद पवारांनी यावेळी नमूद केलं.