वाघाला सांभाळणे, माझी जबाबदारी.. संजय राऊतांवर मुनगंटीवारांचा पलटवार
'माझी भाषा कधीही तोडणारी नाही तर जोडणारीच आहे. मी वनमंत्री आहे. वाघाला सांभाळून ठेवणे माझी जबाबदारी आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे. घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, हे मी फक्त महितीत्सव बोललो, राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास करत राईचा पर्वत केला, असे अग्रलेख लिहून युती तोडायचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत मुनगंटीवारांनी संजय राऊतांना सुनावले आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल येऊन आठ दिवस उलटले आहे. जनतेने महायुतीला जनादेश देखील दिला. मात्र, सरकार स्थापनेबाबत अद्यापही कोणताही निर्णय होऊ शकला नाही. यादरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेत्यांमध्ये वाद विवाद होताना दिसत आहेत.
शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असा पुनरुच्चार राऊत करत आहेत. दरम्यान वेळेत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. तर राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाहीत, असा पलटवार संजय राऊत यांनी मुनगंटीवारांवर केला होता. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया आली आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "वेळेत सरकारची स्थापना न केल्यास काय होईल असा प्रश्न आम्हाला विचारण्यात आला. यावर घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, असे सहज उत्तर आम्ही दिले. जर शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असेल मात्र तो चेतावणी म्हणून घेण्यात आला आहे का? सरकार हे महायुतीचे बनणार आहे. शिवसेनाला भाजपासोबत यावे लागेल.
दुसऱ्यासोबत जाणे ही जनतेची प्रतारणा होईल. दोन ते चार दिवसांत शपथविधी होईल. देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळाचे नेते असतीलय. 'शेर कभी घास नही खाता, कोणाला काय ऑफर हे कॅमेरासमोर सांगायचे नसते, भाजप दबावाखाली नसल्याचे मुनगंटीवारांनी यावेळी स्पष्ट केले.