
'जोपर्यंत शिवसेना युतीतून बाहेर पडत नाही तोपर्यंत या परिस्थितीवर उपाय निघणार नाही'- अशोक चव्हाण
विधानसभेच्या निकालाला 12 दिवस उलटूनही सरकार स्थापन झालेलं नाहीये. यातच अनेक राजकीय गाठी-भेटी सुरू असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यातच सध्याच्या "परिस्थितीला भाजप जबाबदार आहे, कारण तो मित्रपक्षांना विश्वासात घेत नाही," असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.
एकीकडे भाजप नेते युतीचंच सरकार येईल, असा दावा करत असताना शिवसेनेकडून मात्र ठरल्याप्रमाणे झाल्याशिवाय चर्चा नाहीचा पवित्रा कायम आहे. सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आता पुढाकार कोण घेणार हा प्रश्न असताना काँग्रेसने मात्र वेगळेच संकेत दिले.
"विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील सध्याच्या स्थितीला भाजप जबाबदार आहे, कारण तो मित्रपक्षांना विश्वासात घेत नाही. युतीतल्या दोन पक्षांमध्ये तणाव आहेत. बहुमत असूनही अद्याप युतीची सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही. आता जोपर्यंत शिवसेना या युतीतून बाहेर पडत नाही तोवर या परिस्थितीवर उपाय निघू शकत नाही." असेही चव्हाण म्हणाले.