
शिवतीर्थावर फडणवीस यांच्याविरोधात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
शिवसेनेचे संस्थापक आणि हिंदूह्रदयसम्राट दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने शिवसेनेसोबतच भाजपच्या नेत्यांनी देखील त्यांना शिवतिर्थावर आदरांजली वाहिली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी देखील शिवतिर्थावर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले. मात्र यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ‘स्वाभिमाना’चा उल्लेख केला होता. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील उत्तर देत ‘आम्हाला कोणी स्वाभिमान शिकवण्याची गरज नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल’, असे म्हटले होते.
देवेंद्र फडणवीस शिवाजीपार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करून परतत असताना शिवसैनिकांनी ‘सरकार कोणाचे ? शिवसेनेचे’, अशी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी भाजप नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे हे देखील उपस्थित होते.