आज 7 जण शपथ घेतील, मी नाही, भाजपबाबत खोदून-खोदून विचारु नका - अजित पवार

frame आज 7 जण शपथ घेतील, मी नाही, भाजपबाबत खोदून-खोदून विचारु नका - अजित पवार

Thote Shubham

मुंबई : “मी आज शपथ घेणार नाही, आज मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतील, त्याशिवाय राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ शपथ घेतील, काँग्रेसकडून कोण शपथ घेणार माहीत नाही, तो त्यांचा अधिकार आहे, मुख्यमंत्री आणि 6 जण आज शपथ घेतील”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांनी एक्स्क्लुझिव्ह टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

 

मी भाजपसोबत का गेलो होतो त्याबद्दल मी योग्य वेळ आल्यावर बोलेन. आज मी त्याबद्दल काही बोलणार नाही, असं अजित पवार म्हणाले. भाजपसोबत का गेलो हे मला खोदून खोदून विचारु नका, मी योग्य वेळ आल्यावर बोलेन हे यापूर्वीच सांगितलं आहे. असं अजित पवार म्हणाले.

 

राष्ट्रवादीच्या संदर्भातील सगळा निर्णय शरद पवारसाहेबांचा आहे. मी 4.30 वाजता शपथविधीसाठी निघेन. सुप्रिया आणि मी शपथविधीला जाणार आहे. हा शपथविधी झाल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. त्यानंतर बाकीचं मंत्रिमंडळातील स्थान यावर निर्णय होईल, असं अजित पवारांनी सांगितलं.

 

काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत शपथ घेण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत नक्की माहिती नाही. उपमुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही अंतिम निर्णय नाही. शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्याबाबत प्राथमिक प्रयत्न असेल. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद अशी चर्चा सध्या माझ्या कानावर नाही. कानावर आलं की तुम्हाला सांगेन, असं अजित पवार म्हणाले.

 

भाजपशी हातमिळवणीबाबत मला वाटतंय तोपर्यंत अवाक्षरही काढणार नाही. चांगलं घडत असताना त्यावर बोलणं मला उचित वाटत नाही सरकार शेवटपर्यंत टिकावं असा प्रयत्न सगळे मंत्री, आमदार आणि मुख्यमंत्र्यांचा असतो, असं अजित पवारांनी सांगितलं.

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More