भाजप नेत्याच्या दाव्यावर फडणवीसांचे स्पष्टीकरण

Thote Shubham

मुंबई: फडणवीसांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले. अनंत कुमार हेगडे यांचा दावा आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. एक नवा पैसाही केंद्राला परत पाठवलेला नाही, केंद्राकडून पैसा आलाच नाही, शिवाय काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

 

अजित पवारांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करणे ही एक चाल होती. 80 तासांसाठी फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि केंद्राचे 40 हजार कोटी रुपये त्यांनी वाचवले, असा दावा भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले.

 

नेमके काय अनंत हेगडे म्हणाले हे मला माहिती नाही. पण मीडियातून जे काही समजत आहे, त्यावरुन मला माहिती मिळत आहे. अनंत हेगडेंचा दावा शंभर टक्के धादांत खोटा आणि चुकीचा असून महाराष्ट्राने एक नवा पैसादेखील केंद्र सरकारला परत केलेला नाही. मुळातच एक नवा पैसा बुलेट ट्रेनकरिता केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला मिळालेला नाही. बुलेट ट्रेनसाठी एक कंपनी तयार झालेली आहे. जी केंद्र सरकारची आहे. बुलेट ट्रेनचे जेव्हा केव्हा पैसे येतील, तेव्हा ते पैसे या कंपनीमध्ये येतील, महाराष्ट्र सरकारकडे येणार नाही. केवळ जमीन हस्तांतरणाची महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे.

 

अकाऊंटिंगची पद्धत ज्यांना समजते, त्यांना असे पैसे आले आणि परत पाठववले असे कधी होत नाही हे कळते. तसेही जेव्हा मी काळजीवाहू मुख्यमंत्री होतो किंवा मुख्यमंत्री होतो, निवडणुकीनंतर किंवा त्याकाळात एकही धोरणात्मक निर्णय मी घेतलेला नाही. जोपर्यंत नियमित सरकार येणार नाही, तोपर्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार नाहीत, हे मी जाणीवपूर्वक सांगितल्यामुळे धादांत खोटे, चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे. मी पुन्हा स्पष्टपणे सांगतो की एक नवा पैसादेखील महाराष्ट्राचा केंद्राला गेला नाही, केंद्राने तो मागितलेला नाही. मागण्याचा विषय येत नाही, देण्याचा विषय येत नाही.

Find Out More:

Related Articles: