जनादेशाचा अनादर करणाऱ्यांना लोक जास्त काळ सहन करीत नाही – फडणवीस

Thote Shubham

पुणे – कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालांतून जर कोणी जनादेशाचा अनादर करीत असेल तर मतदार त्याला जास्त काळ सहन करीत नाही, हेच दिसून आले असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी कर्नाटकमधील भाजप उमेदवारांचे अभिनंदन केले. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट त्या पार्श्वभूमीवर सूचक मानले जात आहे.

 

संधीसाधू राजकारणाला लोक कसे उत्तर देतात हे दिसून आले आहे. जनादेश नसतानाही केवळ सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांनाही लोकांनी या निकालातून उत्तर दिले आहे. जनादेशाचा अनादर करणाऱ्यांना लोक जास्त काळ सहन करीत नाहीत हेच सिद्ध झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

सोमवारी कर्नाटकमधील पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. भाजपचे १५ पैकी ११ ठिकाणी उमेदवार विजयी होणार असल्याचे दिसते आहे. यापैकी सहा ठिकाणचे निकाल जाहीर झाले असून, तिथे भाजपच्या उमेदवारांना यश मिळाले आहे.

 

कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचे सरकार या निकालांमुळे बहुमतात आले आहे. त्यामुळे राज्यात राजकीय स्थैर्य निर्माण होणार आहे. राजकीय स्थैर्यासाठी कर्नाटकमधील जनतेने भाजपवर विश्वास दाखवला, याबद्दल त्यांनी तेथील जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आभार मानले आहेत.                                                  

Find Out More:

Related Articles: