महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत 2 लाखापर्यंतची कर्जमाफी
नागपूर – शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली असून या योजनेला महात्मा फुले कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनात याची घोषणा करताना शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होईल. यामध्ये 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकित कर्ज माफ केले जाणार असल्याचे ठाकरेंनी स्पष्ट केले.
येत्या मार्च महिन्यापासून ही कर्जमाफी योजना लागू होणार आहे. पण ही कर्जमाफी अपुरी असल्याचे म्हणत भाजपने सभात्याग केला. दरम्यान, लवकरच या कर्जमाफीवर सविस्तर माहिती जारी केली जाईल, असे राज्य सरकारने सांगितले आहे.
भाजपने मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली कर्जमाफी योजना अपुरी असल्याचा आरोप केला. सभागृहात उभे राहून या घोषणेचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला. कर्जमाफीसह सात-बारा कोरा करणार असेही आश्वासन राज्य सरकारने दिले होते. त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही.
या कर्जमाफी योजनेला दोष देतानाच भाजप सभात्याग करत असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. यानंतर सभागृहाबाहेर पडून पत्रकारांशी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी संवाद साधला. सात-बारा कोरे करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते त्या शब्दाचे काय झाले. या सरकारने प्रत्यक्षात शेतकऱ्यांची दिशाभूल केली असा आरोप भाजपने केला आहे.