महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात आता मुख्यमंत्री कार्यालय

Thote Shubham

नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात मोठी घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय उभारण्यात येईल, असे जाहीर केले. विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली.

 

ग्रामीण भागातील लोक मंत्रालयात मोठ्या संख्येने येतात. बरीचशी कामे असतात. पण त्यांच्यासमोर मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना कसे भेटायचे हा प्रश्न असतो. या लोकांना मुंबईत मंत्रालयात हेलपाटे मारायला लागू नयेत, यासाठी प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय उभारणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

 

लोकांच्या अडीअडचणी असतील, त्यांच्या काही तक्रारी असतील, काही मदत लागेल त्याबाबत तेथील कार्यालयात सांगितल्यानंतर ते कार्यालय मंत्रालयाशी ‘कनेक्ट’ असेल, तेथून थेट लोकांचे प्रश्नी मार्गी लावण्यात येतील, अशी माहितीही ठाकरे यांनी दिली.

 

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विदर्भातील विकासकामांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी टोला लगावला. सत्तेचे विकेंद्रीकरण व्हायला हवे. सत्ता एका हातात एकवटली तर गडबड होण्याची शक्यता असते. विदर्भाबाबत बोलायचे झाले तर, आम्हाला देवेंद्र फडणवीस यांची मदत नक्की लागेल. कारण तुमचा विदर्भाचा जितका अभ्यास आहे, तितका माझा नाही हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो, असे ठाकरे म्हणाले          

Find Out More:

Related Articles: