मुख्यमंत्री साहेब सरकारने घेतलेल्या निर्णयांच श्रेय एकट्याने घेऊ नका, राष्ट्रवादीचे शिवसेनाला पत्र
राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन निर्णय घेत आहे. त्यामुळे घेतलेल्या निर्णयांचे श्रेय केवळ शिवसेनेने घेऊ नये, अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशिक्षण विभागाच्या प्रदेश सरचिटणीस विजय सुरासे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
पत्रात ते म्हणतात की, मुख्यमंत्री साहेब, महाविकास आघाडीच्या नावाखालीच सरकारी योजना,निर्णय आणि योजनांना प्रसिद्धी द्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या तिन्हीही पक्षांनी एकत्र येत ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ तयार केला. त्यामुळे सरकारचे निर्णय, योजना राबवताना तिन्हीही पक्षांचा समान वाटा आहे.
मात्र सरकार घेत असलेल्या निर्णयाची जनतेला बॅनरच्या माध्यमातून जिल्हास्तरावर माहिती देतांना बॅनरवर फक्त शिवसेनेचा उल्लेख दिसून येतोय. त्यामुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आणि जनता यांच्यात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे जिल्हास्तरावर सरकारचे निर्णय, योजना यांची माहिती बॅनरद्वारे देताना फक्त शिवसेनेऐवजी महाविकास आघाडीचा उल्लेख करावा, अशी मागणी विजय सुरासे यांनी पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान औरंगाबाद, पुणे , मुंबई अशा राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कर्जमाफीच्या समर्थनात फ्लेक्स लावले गेले. या बॅनर केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे फोटो लावण्यात आले. त्यामुळे शिवसेना एकटीच या महत्वकांक्षी निर्णयाचे श्रेय घेत असल्याचा संदेश या बॅनरबाजी मधून जात आहे, असे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.