कॉंग्रेसने आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविले आहे : देवेंद्र फडणवीस
भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात एका पुस्तिकेमुळे खळबळ उडाली आहे. शिबिरात वाटप करण्यात आलेल्या पुस्तिकेनुसार, हिंदू महासभेचे संस्थापक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांच्यात शाररीक संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. ” स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण असलेली पुस्तिका काँग्रेस पक्षाने वितरित करून आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविले आहे. तसेच काँग्रेस पक्षाची ही बौद्धिक आणि मानसिक दिवाळखोरी आहे अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. तसेच अशा दिवाळखोर पक्षाशी अनैसर्गिक आघाडी केलेली शिवसेना या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालणार की केवळ सत्तेसाठी आपल्या आराध्यांचे असे अपमान वारंवार सहन करणार? असा प्रश्नही फडणवीस यांनी विचारला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर पहिली प्रतिक्रिया त्यांनीच आपल्या खास शैलीतच दिली असती. आज तशी अपेक्षा करता येत नसली तरी या पुस्तकावर तत्काळ बंदीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. अशी आम्हाला अपेक्षा आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.